उद्यापासून अनिश्चित काळासाठी पुण्यातील मार्केटयार्ड बंद


पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय मार्केटयार्ड आडते असोसिएशनने घेतला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढला असल्यामुळे सर्व परिसर सील करुन कर्फ्यू सुद्धा लावला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे.

सध्या मार्केटयार्ड परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. मार्केट यार्ड परिसर आणि त्याच्या पूर्वेकडील भाग सील करण्यात आला आहे. येथे फक्त बाहेरुन मालाची आवक होत आहे. तसेच घाऊक व्यापाऱ्यांनाच येथे खरेदीसाठी परवानगी दिली जात आहे. याशिवाय बाहेरुन आलेल्या ट्रक, टेम्पोंना गटागटाने आत प्रवेश दिला जात आहे.

10 एप्रिलपासून कामगार, तोलणार टेम्पो संघटनांचे सर्व सदस्य मार्केटयार्डमध्ये येणार नाहीत. परिणामी येथील चढउतार बंद होणार आहे. त्यामुळे आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 10 एप्रिलपासून कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची आवक करु नये, असे आडते असोसिएशनने म्हटले आहे.

Leave a Comment