पुन्हा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार मोदी; 11 तारखेला होऊ शकतो मोठा निर्णय


नवी दिल्ली : कोरोनाच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक घेतली होती. अशी बैठक देशव्यापी लॉकडाउन सुरू व्हायच्या आधीही झाली होती त्यानंतरही एकदा ती झाली आता 21 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपत आला असताना पंतप्रधान 11 एप्रिलला पुन्हा एकदा राज्यांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मागील बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाशी लढा कसा द्यायचा, लॉकडाऊननंतर काय करायचे याविषयी सूचना देण्यास सांगितले होते. आता 11 एप्रिलची बैठक मुख्यतः लॉकडाऊनसंदर्भातच असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तो कमी होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे या परिस्थितीत लॉकडाऊन सरसकट उठवणे योग्य नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते आता हीच चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर करतील आणि त्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना सर्व भागांतून 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन उठवणे शक्य होणार नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करतील पण लॉकडाऊन लवकरच संपेल अशी शक्यता दिसत नाही. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा आयुष्य पूर्वीसारखे नसेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. यापुढे आयुष्यात ‘कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर’ हे स्वरुप असेल.

व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदींनी राजकीय नेत्यांना सांगितले की, यापुढे मोठ्या प्रमाणात वर्तणूक, सामाजिक आणि वैयक्तिक बदल घडवून आणायला हवेत. कोरोनाविरूद्धच्या लढ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 5,194 वर पोहोचली आहे. या बैठकीत आरोग्य सचिव, गृहसचिव यांनी सद्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती सविस्तरपणे सांगितली. यापूर्वी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचे आवाहन केले आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचे आवाहन केले जात आहे.

Leave a Comment