पुण्यात सकाळपासून पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू


पुणे – जगभरातील बहुतेक देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील कोरोनाला बळी पडणाऱ्या लोकांच्या आकड्यातही वाढ होत आहे. आज सकाळपासून पुण्यात पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुळे शहरातील मृत्यू झालेल्यांची संख्या आता 13 वर पोहचली आहे. सकाळापासून शहरातील नायडू रुग्णालयात -1, नोबेल रुग्णालयात – 1 आणि ससून रुग्णालयात 3 अशी एकूण 5 जणांचा मृत्यूची नोंद झाल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

पुणे शहरात आज 1567 नागरिकांनी कोरोनाची तपासणी केली असून त्यापैकी 1417 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर 158 रुग्ण बाधित आढळले आहेत. तसेच या दरम्यान 17 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज शहरात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याचे आरोग्य विभाग मार्फत सांगण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग सरसकट बंदी असतानाही आदेशाचे पालन होत नसल्यामुळे वाढत असून दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी महर्षिनगर, कोंढव्यासह या लगतच्या पेठांमधील भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे.

शहरातील काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या बाबतची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, पण संबंधित भागातील रुग्णालये, औषधे विक्री दुकाने, दूध विक्री, किराणा माल, भाजीपाला दुकाने अशा अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. परंतु, या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडणे, आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात जाणे आणि वाहतुकीवर संपूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.

संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी संबंधित भागात करण्यात येत आहे. टाळेबंदी केलेल्या भागात करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे.

Leave a Comment