मुंबई पोलिसांकडून भाजप नेते किरीट सोमय्यांना अटक


मुंबई – मुंबई पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक केली आहे. मुलुंड येथील त्यांचे निवासस्थान निलम नगर येथून किरीट सोमय्या यांना अटक करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना अटक करुन मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे. ट्विटरवर किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला भेटण्यासाठी चाललो असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. किरीट सोमय्या सकाळी ११ वाजता भेट घेण्यासाठी चालले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

मुंबई पोलिसांनी मला जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी मारहाण केलेल्या अनंत करमुसे याला भेटण्यासाठी त्याच्या निवासस्थानी जात असताना ताब्यात घेत रोखले. सकाळी ११ वाजता मी त्याची भेट घेणार होतो, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये पोलिसांनी आपल्याला अटक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला माझ्या निवासस्थानावरुन पोलिसांनी अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात नेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

किरीट सोमय्या यांना अटक केल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. दिल्ली मरकजहून परतलेल्या तबलिगी जमातच्या लोकांना शोधायला महाराष्ट्र सरकारला वेळ नाही, पण सामान्य जनतेला मदतकार्य करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक करायला भरपूर वेळ आहे. जाहीर निषेध!!!,” असे ट्विट भाजपकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment