कुर्ल्याच्या एल विभागात सापडले कोरोनाचे १४ नवे रुग्ण


मुंबई : कोरोनाग्रस्तांचा महाराष्ट्रातील आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून त्यातच मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. आता कोरोनाचे १४ नवे रुग्ण कुर्ल्यात देखील आढळले आहेत. एकूण १४ रुग्ण कुर्ल्याच्या एल विभागात सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. १४ पैकी ८ रुग्ण झोपडपट्टीमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचे रूग्ण कुर्ल्याच्या पश्चिम भागातील जरीमरी, पाईप रोड या भागातील झोपडपट्टींमध्ये मिळू लागल्याने धोका वाढू लागला आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता याठिकाणी टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर रूग्ण मिळालेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जात आहे. तर दुसरीकडे वरळीचा भाग येत असलेल्या जी दक्षिण विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. याठिकाणी कोरोना ग्रस्तांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. तर भायखळ्याचा भाग असलेल्या ई विभागात ४८ रुग्ण, मलबार हिलच्या डी वॉर्डात ४० रुग्ण आणि अंधेरी पश्चिमच्या के पश्चिम विभागात ४० रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असल्यामुळे कोरोनाबद्दल अतिदक्षता घेण्याची गरज भासत आहे.

दरम्यान, एकट्या मुंबईत कोरोनाचे नवे ७० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा आता ५२८ वर गेला आहे. तर काल दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८७२ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ५२वर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात नवे १२४ रूग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment