व्होकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा


मुंबई: मुंबईतील प्रसिध्द अशा मुंबई सेंट्रल स्थित व्होकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले असून मुंबई महानगरपालिकेकडून कालच व्होकहार्ट रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला होता. आता कंटेनमेंट झोनचे फलकही याठिकाणी लावण्यात आले होते.

या सर्वांना कोरोनाची लागण कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे झाल्याचे सांगितले जाते. यासाठी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले होते. तर हे सर्व आरोप व्होकहार्ट रुग्णालयाकडून फेटाळण्यात आले आहेत.

यानंतर रुग्णालयातच या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. रुग्णालय सील करण्यात आल्यामुळे ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक रुग्णांना घरी पाठवण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेले आणि संशयित असे कस्तुरबा रुग्णालयातून जवळपास २० रुग्ण व्होकहार्टमध्ये दाखल करण्यात आले होते. यापैकी कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पण, संशयितांना अन्य रुग्णांसोबत अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याने इतरांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्संना एन ९५ मास्क, कोरोनाप्रतिबंधक पोशाख अशी कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती.

Leave a Comment