पुढील अंदाज घेऊन जाहिर होणार विद्यापीठ, महाविद्यालय अन् सीईटी परीक्षेचे वेळापत्रक


मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयीन तसेच सीईटीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी राज्य सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर केले जाणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी गठीत करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून ही समिती महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Leave a Comment