कोरोनारोधक साहित्य वाटप करुन भाजपने फोडले नव्या वादाला तोंड


मुंबई : देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना देखील भाजपने आपल्या प्रचाराची संधी गमावलेली नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईतील रिक्षाचालकांना भाजपच्या स्थापनादिनाचे औचित्य साधत भाजपप्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर वाटण्यात आले. या वस्तूंचे वाटप भाजपचे आमदार आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि रिक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफात शेख यांच्या हस्ते करण्यात आले. आशिष शेलार आणि हाजी अराफात शेख यांची नावे देखील या मास्कवर आहेत. त्यामुळे यावर आता राजकीय क्षेत्रात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मास्क लावणे, ग्लोव्हज घालणे आणि सॅनिटायझरचा वापर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करणे गरजेचे आहे. याचे पालन मुख्यतः जे इतर नागरिकांच्या जास्त संपर्कात येत आहेत, त्यांनी करणे अत्यावश्यक आहे. मुंबईमधील रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांच्या संपर्कात येत असतात. त्यांना आज भाजपप्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

आज भाजपचा 40 वा स्थापना दिवस आहे. याच निमित्ताने भाजपचे आमदार आशिष शेलार आणि हाजी अराफात शेख यांच्या हस्ते मुंबईतील गरीब रिक्षाचालकांना मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वस्तूंचे वाटप करणे एकप्रकारे चांगली गोष्ट असली तरी यातून भाजपने प्रचार केल्याचे समोर आले आहे. एकीकडे सरकार, अत्यावश्यक यंत्रणा सर्वोतोपरी मदत करत असताना, भाजपने या परिस्थितीतही मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरच्या माध्यमातून प्रचाराची संधी सोडलेली नाही.

याआधी देखील असाच प्रकार पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीच्या वेळीही घडला होता. भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांचा फोटो या मदतीची पाकिटांवर छापण्यात आला होता.

कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. गरीबांना मास्क किंवा ग्लोव्हज सारख्या वस्तूही विकत घेता येत नसल्यामुळे रिक्षाचालकांना या वस्तूंचे वाटप करुन हा सामाजिक कार्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आमदार आशिष शेलार यांनी दिली. तसेच केंद्राच्या जीआरप्रमाणे रिक्षाचालकांना राज्याने देखील पाच किलो धान्य द्यावे अशी मागणी शेलार यांनी केली.

Leave a Comment