कोरोनामुक्त होऊन घरवापसी झालेली कनिका कपूर ट्रोल


बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोना झाल्यामुळे राजकीय आणि सिनेक्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कारण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्या कार्यक्रमात राजकीय तसेच क्षेत्रातील बरेच दिग्गज उपस्थित होते. त्यातच आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका पूर्णपणे बरी झाली असून तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देखील आला आहे.

कनिकाची पाचवी चाचणी 4 एप्रिलला करण्यात आली. यात तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. यानंतर तिचा सहावा रिपोर्टही निगेटीव्ह आल्यानंतर रूग्णालयातून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त होऊन कनिका घरी परतल्याने तिचे कुटुंब आनंदात आहे. पण सोशल मीडियावरच्या काही लोकांना तिचे घरी परतणे कदाचित फारसे रूचले नसल्यामुळे तिला नेटक-यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कनिका पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तिच्यावर निष्काळजीपणा बाळगल्याचा आरोप झाला होता. तेव्हाही ती प्रचंड ट्रोल झाली होती. आता रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही ती ट्रोल होत आहे. सोशल मीडियात तिच्यावरचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. यात कनिकाला लक्ष्य केले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच लंडनवरून कनिका कपूर भारतात परतली होती. कनिकाने लंडनवरुन भारतात परतल्यावर एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेते आणि न्यायाधीश यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते. यानंतर कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांचे धाबे दणाणले होते. निष्काळजीपणा बाळगून अनेकांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तूर्तास यावरूनही कनिकाला ट्रोल केले जात आहे.

Leave a Comment