सांगली ; लॉकडाऊनचे आदेश पायदळी तुडवत सामूहिक नमाज पठण, 41 जण ताब्यात


सांगली : नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकजमध्ये झालेले प्रकरण ताजे असताना सागंली जिल्ह्यातील मिरजेत मटण मार्केट येथील बरकत मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 41 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी ही मशीद सील केली आहे. या 41 जणांवर कडक कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मिरजमधील मुख्य मौलानाकडून या 41 जणांचे काऊन्सिलिंग सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या दरम्यान मंदिरे, मशिदींमध्ये होणारे धार्मिक विधीही बंद करण्यात आले आहेत. नवी दिल्ली येथे दोनच दिवसांपूर्वी हजरत निजामुद्दीन दर्ग्यात मरकज या धार्मिक कार्यक्रमानिमित्त हजारो मुस्लिम एकत्र आले होते. देशातील विविध राज्यात मरकजमध्ये सामील झालेले मुस्लीम विस्तारल्याने कोरोना संसर्ग वाढण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांकडून गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही धार्मिक विधी, कार्यक्रमासाठी कोणत्याही समाजाने एकत्र येऊ नये, कार्यक्रम रद्द करावेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

असे असताना शहरातील मटण मार्केटजवळ बरकत मशिदींमध्ये शुक्रवारी (3 एप्रिल) 41 हून अधिक मुस्लिम एकत्र येऊन नमाज पठण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत तेथे नमाज पठण करणाऱ्या मुस्लिमांना ताब्यात घेतले. यावेळी 30-35 जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना पकडले.

तर असाच काहीसा प्रकार गडहिंग्लजमध्ये देखील घडला असून तेथील मशिदीत सामूहिक नमाज पठण करण्यासाठी जमलेल्यांना ताब्यात घेतले आहे. मशिदीच्या समोरच्या दरवाजाला कुलूप लावून मागील दरवाजाने प्रवेश केला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच कारवाई केली. त्यापैकी अनेकजण पळून गेले तर उर्वरित नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Comment