इतिहासजमा होणार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृतांजन पुल


पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृतांजन पुल इतिहासजमा होणार असून पुलाचे बांधकाम उद्यापासून पाडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. त्यामुळे या मार्गावर अत्यावश्यक सेवा असणारी वाहने सुरु आहेत. त्यामुळे उद्यापासून येथील वाहतूक बंद राहणार आहे.

नियंत्रित स्फोटकांच्या साहाय्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील जुना अमृतांजन पुल पाडण्यात येणार आहे. या कामाला उद्या ४ एप्रिलपासून सुरुवात होणार असून १४ एप्रिलपर्यंत ते चालणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे महामार्गावरील वाहने अत्यंत तुरळक असल्याने वेळ साधत हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांची आवश्यक परवानगी रस्ते विकास महामंडळाने घेतली आहे.

अनेक वर्षे बोरघाटातील हा ब्रिटिशकालीन पूल वापरासाठी बंद असला तरी या पुलाखालून द्रुतगती महामार्गाने जाणारी वाहने ये जा करीत असतात. त्यामुळे हा पूल कोसळला तर धोकादायक ठरु शकतो. या पुलाचे पाडकाम सुरु असताना महामार्गावरील वाहतूक लोणावळा-खंडाळा मार्गे सुरुच राहणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment