मौलाना महमूद मदनी यांच्याकडून लॉकडाउन न पाळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांचा निषेध


नवी दिल्ली – जमात-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी मुस्लीम धर्म किंवा नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग तसंच लॉकडाउन न पाळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांचा निषेध केला आहे. सर्व मुस्लिम समाज कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी कटिबद्ध आहेत. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. याचे पालन नमाजच्या वेळी देखील झाले पाहिजे, असे मौलाना महमूद मदनी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग न पाळणे हराम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मौलाना महमूद मदनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. १० लाख मशिदी भारतात आहेत. सरकारच्या आदेशांचे पालन सर्वजण करत आहेत. आम्ही सगळे कोरोनाविरोधातील लढाईत एकत्र आहोत. भारतातील मुस्लीम १०० टक्के देशासोबत असून अशीच साथ देत राहू, असे मौलाना महमूद मदनी यांनी म्हटले आहे.

दरम्यान मौलाना महमूद मदनी यांनी तबलिगी जमात मकरजचे प्रमुख मौलाना साद यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरही मत माडंले आहे. मौलाना साद या ऑडिओ क्लिपमध्ये सांगत आहेत की, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची काही गरज नाही. कोरोनाच्या नावाखाली मुस्लिमांना त्यांच्या धर्मापासून दूर ठेवण्याचा हा कट आहे. मौलाना महमूद मदनी यांनी हे अत्यंत चुकीचे वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ती ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी हे तपासणे गरजेचे असल्याचे मौलाना महमूद मदनी यांनी म्हटले आहे. पण पुढे बोलताना जर ही खरी असेल तर हा अत्यंत चुकीचा संदेश असल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान सरकार आणि प्रशासनाला जमियत-उलेमा-ए-हिंदच्या प्रमुखांनी तबलिगी जमातच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये असे म्हटले आहे. माणुसकीने हे प्रकरण सोडवले पाहिजे. द्वेषाने नाही. मरकजच्या सदस्यांना सुरक्षित वाटेल ही सरकारची जबाबदारी आहे. योग्य ती वैद्यकीय मदत त्यांना पुरवली पाहिजे. शिक्षा किंवा खटल्याची प्रक्रिया नंतरही होऊ शकते, असे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व सदस्यांनी पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहनही केले आहे.

त्याचबरोबर यावेळी तबलिगी जमातचा कार्यक्रम दुर्दैवी असल्याचे मौलाना महमूद मदनी यांनी म्हटले आहे. जी माहिती समोर येत आहे त्यावरुन तरी जे काही झाले ते दुर्दैवी आणि गुन्हा आहे. पण याची अजून एक बाजू आहे जी समोर येत आहे. ती खरी आहे की खोटी माहिती नाही. हे जाणुनबुजून केले होते का याची अद्याप कल्पना नाही. पण कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम व्हायला नको होता, असे ते म्हणाले आहेत.

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर तबलिगी जमातच्या सदस्यांकडून होणारा हल्ला चुकीचा असल्याचे ते म्हणाले आहेत. तबलिगी जमातच्या सदस्यांनी डॉक्टर आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्यावर हल्ला करणे गुन्हा असून हे एका हत्येप्रमाणे आहे. सोशल डिस्टन्सिंग जर कोणी पाळत नसेल किंवा लपत असेल तर ते अल्लाहला नाराज करत आहेत. आपल्याला किंवा दुसऱ्याला अशा पद्धतीने धोक्यात घालणे मुस्लीम व्यक्तीसाठी हराम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment