वरळी कोळीवाड्यात ऑनड्युटी असलेल्या पोलिसाला कोरोनाची लागण


मुंबई : कोरोनाची लागण रेल्वे पोलिसांनंतर आता मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलला झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. हा पोलिस कॉन्स्टेबल ‘व्हीआयपी’ सुरक्षेसाठी तैनात असून तो वरळी येथील पोलिस वसाहतीमध्ये वास्तव्यास आहे. वरळी पोलिस कॅम्पमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने घबराट पसरली असून कॉन्स्टेबल राहत असलेली आणि आजूबाजूच्या काही इमारती सील करण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधीत रुग्णांची मुंबईमधील संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता २४ तास यामध्ये ऑनड्युटी असलेल्या पोलिसांचाही समावेश होऊ लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे ड्युटीवर असलेला एक पोलिस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त ताजे असतानाच मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या आणि व्हीआयपी सुरक्षा विभागात नेमणुकीला असलेल्या पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी हा पोलिस कॉन्स्टेबल आपल्या एका मित्रासोबत लोणावळा येथे जमीन खरेदी करण्यासाठी गेला होता. याचदरम्यान पोलिस दलातच कार्यरत असलेला त्याचा भाऊ सायन रुग्णालयात दाखल होता. भावाच्या देखभालीसाठी रोज सायन रुग्णालयात जाणारा हा कॉन्स्टेबल आजारी पडल्याने त्याला १ एप्रिल रोजी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पत्नी आणि दोन मुले यांचे वेगवेगळ्या रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले आहे.

महापालिकेने पोलिस कोरोना बाधित असल्याचे कळवताच वरळी पोलिसांनी तो वास्तव्यास असलेल्या इमारतीचा आजूबाजूचा परिसर सील केला आहे. वरळी कोळीवाडा, आदर्श नगर पाठोपाठ आता वरळी कॅम्पचा काही परिसर सील करण्यात आल्याने वरळीत प्रचंड घबराट पसरली आहे. वरळी बरोबरच हा कॉन्स्टेबल नेमणुकीला असलेल्या संरक्षण आणि सुरक्षा विभागातही खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment