लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना बारामतीतील न्यायालयाने सुनावली शिक्षा


पुणे : लॉकडाऊनचे उल्लंघन करणे आता बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी तुम्हाला चांगलेच महागाच पडू शकते. कारण आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात केवळ पोलिसांकडूनच दंडुके किंवा वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन सोडले जायचे. पण आता लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास तुमची रवानगी थेट तुरुंगात केली जाईल. बाईकवरुन विनाकारण फिरणे, सूचनांचे दुकानदारांकडून पालन न होणे, अत्यावश्यक सेवा वगळता उगाच बाहेर फिरुन संचारबंदीच्या नियमांचे पालन बारामतीत न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी बारामतीतील बऱ्याच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज न्यायालयाने तिघांना शिक्षा दिली आहे. यात बारामती तालुका पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार अफजल बनीमिया आत्तार रा.श्रीरामनगर, चंद्रकुमार जयमंगल शहा रा.सुर्यनगरी ,अक्षय चंद्रकांत शहा रा.वडगाव निंबाळकर या सर्व आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.

ही शिक्षा थोडी किंवा छोटी वाटत असली तरी भविष्यात चारित्र्य पडताळणीमध्ये या व्यक्तींना शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यात पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाने मिळताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. आपले स्वतःचे भविष्य आपल्या थोड्या चुकीमुळे अंधारात टाकणारे हे पाऊल आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून गंभीरपणाने लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक आहे, असे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment