महाराष्ट्रात खपवून घेणार नाही निजामुद्दीनसारखे प्रकरण : उद्धव ठाकरे


मुंबई : महाराष्ट्रात निजामुद्दीनसारखे प्रकरण खपवून घेणार नाही. कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वेगाने वाढत असताना अनेकांना दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमामुळे संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण उपस्थित असल्याचे समोर येत असल्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले.

निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ या घटनेनंतर बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. हा परिसर रिकामा करण्याचे काम काल रात्री उशीरापर्यंत सुरु होते. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतील कोरोना प्रादुर्भावाचे सगळ्यात मोठे केंद्र बनले आहे आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे समोर येत असल्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास दुकाने उघडी ठेवली आहेत. पण, लोक काही ठिकाणी त्याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत, त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या.

Leave a Comment