
मुंबई : आज पहाटे राज्यातील कोरोना ग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ झाली असून मुंबईत 16 तर पुण्यातून कोरोनाचे 2 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 320 वर पोहोचली आहे. एकीकडे मुंबईकरांची चिंता वाढल्याचे चित्र समोर आले आहे. कारण अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईमध्ये 16 नवे रुग्ण समोर आले आहेत.
अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईत आढळले 16 नवे रुग्ण, राज्याचा आकडा 320 वर
एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यातील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मंगळवारी 24 तासांमध्ये 72 नवे कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यात अवघ्या 12 तासांमध्ये आणखी 16 रुग्णांची वाढ झाली आहे.
एकट्या मुंबई आणि परिसरात 67 आढळले होते. एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतील 59 रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार येथे प्रत्येकी 2 रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 72 ने वाढ झाली होती.
आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मुंबईमध्ये रात्री मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एक 75 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होता. काल रात्री त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टकरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आता राज्यात मृतांचा आकडा 12वर गेला आहे. रात्री हा आकडा 10वर होता पण काल पालघरमध्येही एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
