पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


पुणे – राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातले असून मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त प्रभाव पहायला मिळत आहे. दरम्यान कोरोनाचा पुण्यात पहिला बळी गेला असून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरु होते. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. यासोबत देशात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील ३१ लोक कोरोना बाधित असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी सात जणांवर यशस्वी उपचार करुन घरी पाठवण्यात आले आहे. पण या ५२ वर्षीय व्यक्तीचा आज मृत्यू झाला. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना २१ तारखेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी केले असता कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा त्यांना त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. राज्यात सध्या २१५ कोरोनाचे रुग्ण आहेत. गेल्या १२ तासात १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात पाच, मुंबई तीन, नागपूर दोन, कोल्हापूर एक आणि नाशिकमध्ये एक नवा रुग्ण आढळला आहे. सध्या मुंबईत सर्वाधिक ८५ रुग्ण आहेत.

Leave a Comment