डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या एमआयएम आमदार आणि त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल


मालेगाव : एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना सामान्य रुग्णालयात घातलेला गोंधळ चांगलाच भोवला आहे. कलम 353 नुसार आमदारांसह त्यांच्या 10 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती.

सामान्य रुग्णायलातील वैद्यकीय अधीक्षकांसह इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काल रात्री आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या समक्ष त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. त्यानंतर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर आता आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या ओळखीतील दोन रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टर चालढकल करत होते, असा आमदारांचा आरोप आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.