आनंदवार्ता…! कोरोनाचे पाच रुग्ण झाले बरे


पुणे : एका पाठोपाठ एक कोरोनाचे रुग्ण पुण्यात वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरलेले असतानाच हा मराठी नवीन वर्षासह पुणेकरांसह राज्यातील नागरिकांसह आनंद वार्ता घेऊन आला आहे. पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्यातील पहिल्या रुग्ण दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी असे पाच पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून बुधवारी या दाम्पत्याला घरी सोडण्यात येणार असून गुरुवारी उर्वरीत तिघांना घरी सोडण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

कोरोनाच्या भितीमुळे देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून नागरिकांना सोशल डिस्टस्टिंग ठेवून वागावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. डॉ. नायडू रुग्णालयासह शहरातील अकरा रुग्णालयांमध्ये संशयितांची विलगीकरण आणि उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनेक संशयितांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. राज्यातील पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आल्यानंतर त्याला नायडू रुग्णालयात उपचारांसाठी ९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या रुग्णाची पत्नीही कोरोना बाधित झाली होती. विदेशवारी करुन आलेल्या या दाम्पत्याची मुलगी आणि हे दाम्पत्य मुंबईहून पुण्याला ज्या कॅबमधून आले त्या कॅबचा चालक सुद्धा बाधित झाला होता. या दाम्पत्यासह विदेशवारी केलेला आणखी एक सह प्रवासी सुद्धा बाधित झाला होता.

डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवून या सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले होते. दाम्पत्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीकरिता चौदा दिवसांनंतर पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावर दुस-यांदा हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्टही निगेटीव्ह आल्याने हे दाम्पत्य पुर्णपणे बरे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी गुढी पाडव्याच्या दिवशीच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

चौदा दिवसांनंतरचे त्यांच्या संपर्कातील त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी यांचेही पहिल्या नमुन्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा दुसरा अहवाल प्राप्त होणार असून हे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास त्यांनाही गुरुवारी घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

याबाबत महापालिकेने केलेल्या त्याचबरोबर डॉ. नायडू रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पुण्यातील रुग्णांचा आकडा १९ असून त्यातील पाच रुग्ण बरे झाल्याने हा आकडा १४ पर्यंत खाली आला आहे. ज्यांना घरी सोडण्यात येणार आहे त्या रुग्णांना आणखी चौदा दिवस होम क्वॉरंटाईन करुन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या हातांवर शिक्के मारण्यात आले आहेत. यासोबतच त्यांच्या घराबाहेर होम क्वॉरंटाईनचे स्टिकर लावण्यात आल्याचे अतिरीक्त आयुक्त अगरवाल यांनी सांगितले.

Leave a Comment