नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता पुन्हा देशाला संबोधित करणार


नवी दिल्ली : भारतातही जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. ते आज रात्री 8 वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधणार आहेत. ते यामाध्यमातून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर एखादी मोठी घोषणा देखील मोदी करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान देशात आतापर्यंत देशातील कोरोना ग्रस्तांचा आकडा 500 पार गेला आहे. तर दहा जणांनी आपला जीव गमावला आहे.

आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे की, जागतिक महामारी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत देशातील जनतेशी संवाद साधायचा आहे. आपण आज, 24 मार्च रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे.

पंतप्रधान पहिल्यांदाच एकाच गोष्टीसाठी दोन वेळा देशातील जनतेशी बोलणार आहेत. नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधीही देशातील जनतेला संबोधित केले होते. 18 मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदींनी देशात 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू होता. तसेच याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील मोदींनी केले होते.

Leave a Comment