पुण्यात ‘होम क्वारंटाइन’ असलेले रुग्ण बेपत्ता


पुणे : परदेशवारी करुन पुण्यात परतलेल्या नागरिकांना ‘होम क्वारंटाइन’ राहण्याचा आदेश दिला होता. त्यातील काही जण त्यांच्या घरी आढळून न आल्यामुळे त्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधावा अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे. अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात असून परदेशातून आलेल्या परंतु, कोणतीही लक्षणे नसलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. होम क्वारंटाइन असा शिक्काही त्यांच्या हातावर मारण्यात आला आहे.

पुणे शहरातील होम क्वारंटाइन केलेल्यांची यादी मागवून घेऊन पुणे पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे पोलिसांच्या १३६ पथके या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. या यादीनुसार पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता बहुतांश लोक त्यांच्या घरी आढळून आले. मात्र, होम क्वारंटाइनचा आदेश दिलेल्यापैकी काही जण त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाही.

बेपत्ता झालेले हे नागरिक कदाचित त्यांच्या गावी अथवा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नागरिकांनी तातडीने १८००२३३४१३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. जर त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment