काही तासांत मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण पॉझिटिव्ह


मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई आणि पुण्यात गेल्या काही तासांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहेत. मुबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. हे रुग्ण कोण आहेत आणि यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा आता आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे राज्यात आणखी एक मृत्यू झाला आहे.

संपूर्ण देशात कोरोनावर मात करण्यासाठी आज जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असे असताना महाराष्ट्रामध्ये आणखी एका कोरोना ग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा दुसरा बळी असून एका 64 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. हे आकडे काही तासांमध्ये वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 324 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment