आता खासगी लॅबमध्येही करता येणार कोरोनाची टेस्ट


मुंबई : आपल्या देशावर असलेल्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे 315 रुग्ण आढळले आहेत. शनिवारी आणखी नवीन 60 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. हा आकडा महाराष्ट्रातही जवळपास 70हून अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यापैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर येणारा भार लक्षात घेता आता खासगी लॅबमध्ये कोरोना व्हायरसच्या टेस्ट करता येणार असल्याची माहिती मिळत आहे. या टेस्ट नागरिकांसाठी 4,500 रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये खासगी लॅबमधील कोरोनाच्या चाचण्यांसाठी 4,500 पेक्षा अतिरिक्त शुल्क आकारले जावू नये, असे सांगण्यात आले आहे.

इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व एनएबीएल प्रमाणित खासगी प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी घेण्यास परवानगी दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी रात्री दिली. कोरोनाचे मार्गदर्शक सूचनांनुसार संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना स्क्रिनिंग टेस्टसाठी एक हजार तर अतिरिक्त चाचण्यांसाठी 3,500 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. राष्ट्रीय टास्क फोर्सने यासंदर्भात शिफारस केली होती. कोरोनाची चाचणी करण्यासाठी येणाऱ्याकडून जास्तीत जास्त 4,500 रुपये शुल्क आकारण्यात यावे.

केंद्रीय मंत्रालयाकडून दिलेल्या निर्देशांक आणि सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या लॅबवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णाचे चाचणीसाठी नमूने घेताना आणि चाचणीदरम्यान योग्य ती काळजी घेणं आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Leave a Comment