शपथपत्रात शरद पवारांनी जाहिर केली आपली एकूण संपत्ती


मुंबई : राज्यसभेसाठी गुरुवारी आपला उमेदवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी आपला अर्ज मुंबईमध्ये विधानभवनात भरला. शरद पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे. यामध्ये, शरद पवार यांची संपत्ती गेल्या सहा वर्षांत ६० लाखांनी वाढल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांनी शपथपत्रात ३२.७३ करोड रुपयांची आपली एकूण मिळकत असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये २५,२१,३३,३२९ रुपयांची जंगम आणि २,५२,३३,९४१ रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्याचबरोबर आपल्यावर एक करोड रुपयांचे ऋण असल्याचेही पवारांनी या शपथपत्रात नमूद केले आहे. त्यांनी शपथपत्रात प्रतिभा पवार यांचा ‘ऍडव्हान्स डिपॉझिट’ म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचेही नमूद केले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच हिंदू अविभाजित कुटुंब नियमाप्रमाणे, शरद पवार यांना ‘ऍडव्हान्स डिपॉझिट’ म्हणून नातू – अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्याकडून ५० लाख रुपये मिळाल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात पवारांनी २०,४७,९९,९७०.४१ रुपयांची जंगम मालमत्ता आणि ११,६५,१६,२९० रुपयांची स्थावर मालमत्ता अशी मिळून ३२.१३ कोटींची संपत्ती जाहीर केली होती.

Leave a Comment