खैरे, रावतेंना डावलत काँग्रेस रिटर्न प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेचे तिकीट


मुंबई : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर दूसरीकडे शिवसेनेनेही आपला एकमेव उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेने काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांची नावे शिवसेनेकडून चर्चेत होती. पण शिवसेनेने निष्ठावंतांना डावलून आपली उमेदवारी प्रियंका चतुर्वेदी यांना जाहीर केली.

शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या. चतुर्वेदींनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्यापुढे होत्या. अखेर त्यांनाच तिकीट जाहीर झाले.

शिवसेनेत अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असा मतप्रवाह होता. त्याचबरोबर या उमेदवारांच्या यादीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत होते. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक होते.

Leave a Comment