एखादी वस्तू उचलताना किंवा चालताना कसे असावे आपले पोश्चर?


बऱ्याच वेळी एखादी वजनदार वस्तू उचलताना, किंवा एखादी वस्तू उचलण्यासाठी खाली वाकताना अचानक पाठीमध्ये किंवा कंबरेत वेदना उठते. हे वेदना वस्तू उचलताना खाली वाकण्याचे पोश्चर चुकीचे असल्यामुळे असू शकते. तसेच चालताना देखील अनेक व्यक्ती खांदे झुकवून चालतात. परिणामी मानदुखी, पाठदुखी सुरु होते. त्यामुळे चालताना देखील पोश्चर योग्य असणे आवश्यक आहे. मग पोश्चर म्हणजे नक्की काय असा प्रश्न मनात येतो. तज्ञांच्या मते, एखादी क्रिया करताना आपल्या सांध्यांची ठराविक स्थिती पोश्चर म्हणून ओळखली जाते. एखादे काम करताना आपले पोश्चर जर योग्य असेल, तर त्या क्रियेशी निगडीत सांधे आणि स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा तणाव जाणवत नाही. जर पोश्चर चुकीचे असेल, तर त्या क्रियेशी निगडीत स्नायूंना काही काळानंतर दुखापत होऊन परिणामी पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी सारख्या व्याधी पाठीस लागतात.

एखादी वस्तू जमिनीवरून उचलून घेण्याची वेळ आपल्याला दिवसातून अनेक वेळा येत असते. त्यामुळे खाली वाकताना जर योग्य पद्धतीने खाली वाकले नाही, तर त्याचा ताण पाठीच्या कण्यावर पडून पाठदुखी सुरु होऊ शकते. विशेषतः महिलांना दिवसातून अनेकदा खाली वाकण्याची वेळ येते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या काढण्यासाठी, कपडे बादलीतून उचलून वाळत घालण्यासाठी, घरातील वस्तू आवरून ठेवण्यासाठी महिलांना खाली वाकावेच लागते. अश्या वेळी पोश्चर योग्य असणे अगत्याचे आहे. अश्या वेळी कंबरेतून एकदम खाली न वाकता चवड्यांवर बसून मग वस्तू उचलून त्यानंतर सावकाश उठून उभे राहावे. असे केल्याने पाठीच्या मणक्यावर ताण येत नाही, व त्यामुळे पुढे उद्भविणारी पाठदुखी टाळणे शक्य होते.

चालताना देखील अनेक व्यक्ती चुकीच्या स्थितीत चालतात. कोणी खांदे झुकवून चालतात, तर कोणाची पावले चालताना बाहेरच्या बाजूला वळलेली असतात. त्याशिवाय चालताना काहींचे पोट एकदम ढिले सोडलेले असते, तर काही जण आपले शरीर आखडून घेऊन चालताना दिसतात. ही सर्वच पोश्चर चुकीची आहेत. ह्या पोश्चरमध्ये जास्त काळ चालल्याने सांधे दुखी, पाठदुखी उद्भवू शकते. चालताना आपल्या शरीराचा भार आपल्या टाचांवर यावयास हवा. त्यामुळे एका पायाच्या टाचेवर भार देऊन मग दुसरे पाऊल पुढे टाकावे. टाचांवर भार आल्याने पावलांच्या चवड्यांवर वजन पडत नाही. तसेच चालताना, विशेषतः व्यायाम म्हणून ज्या व्यक्ती चालतात, त्यांनी चालताना पोटांचे स्नायू आतमधून ओढून घेऊन चालावे. चालताना शरीराचा भार आधी टाचेवर आणि मग पावलांवर यायला हवा. तसेच चालताना पावले बाहेरच्या बाजूला वळणार नाहीत याची काळजी घ्यावयास हवी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment