35 हजार बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार


नवी दिल्ली – येत्या तीन वर्षांमध्ये 35 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या एचएसबीसी बँकेतून लवकरच कपात करण्यात येणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

33% घट वार्षिक नफ्यात झाल्याचे उघडकीस आल्यानंतर 35,000 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये नोकरीवरुन कमी केले जाईल, अशी माहिती बँकेने दिली आहे. त्याचबरोबर 2020 च्या नफ्यात आशिया खंडामध्ये फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे अजून घट होण्याचा इशाराही बँकेने दिला आहे.

बँकेने मंगळवारी बँकेचा वार्षिक नफा 33 ट्क्क्यांहून घसरून 13.3 अब्ज डॉलरवर आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर कर्मचारी नोकरीत कपात करण्याच्या वृत्ताला एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी नोएल क्विन यांनी दुजोरा दिला. नोएल क्विन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या नोकरकपातीचा फटका एचएसबीसीच्या जगभरातील शाखांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बसेल.

जगभरात कार्यरत असलेल्या आमच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. एचएसबीसी बँकेत सध्या दोन लाख पस्तीस हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या या कपातीनंतर दोन लाखांवर येईल, असेही क्विन यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment