फक्त राज्यात कशाला पूर्ण देशात घ्या मध्यावधी निवडणुका; पवारांचे खुले आव्हान


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चोख प्रतिउत्तर दिले आहे. फक्त देशाच्या मध्यावधी निवडणुका होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या, असे म्हणत थेट लोकसभेच्या निवडणूका घेण्याचे आव्हान शरद पवार यांनी भाजपला केले आहे. भाजपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या भाजपला मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी सुनावले आहे.

शरद पवारांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान महाविकास आघाडीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. आम्ही मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी करत असून महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, असे भाजपकडून सांगितले जात आहे, यावर तुमचे काय मत आहे?, असा प्रश्न पवारांना पत्रकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना मध्यावधी राज्याच्या होत नाही संपूर्ण देशाच्या होतात असे सांगत पवारांनी भाजपलाच टोला लगावला.

फक्त देशाच्या मध्यावधी निवडणुका होतात. एखाद्या राज्यात लोकसभेच्या मध्यवधी निवडणुका घ्यायच्या असल्या तर ते भाजपच्या हातात आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेऊन भाजपने पुन्हा निवडणूक घ्यावी, असा खोचक सल्ला पवारांनी दिला. भाजपकडून अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार पडेल असा दावा केला जातो, यावर तुमचे मत काय?, असा प्रश्नही यावेळेस पवारांना विचारण्यात आला. मी अशा गोष्टी गांभीर्याने घेत नाही. विरोधक एकदा हे बोलतात दुसऱ्या दिवशी ते बोलतात. जे राज्याच्या भल्यासाठी शक्य आहे ते करत राहणे हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विचार असल्याचे या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी सांगितले.

Leave a Comment