VIDEO : नेमके काय घडले होते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ


नवी दिल्ली : पोलिसांकडून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना लायब्ररीत घुसून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांकडून 15 डिसेंबर 2019 रोजी विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती. समोर आलेला व्हिडीओ ओल्ड रीडिंग हॉलमधील असल्याचे समोर येत आहे. हा व्हिडिओ जामिया समन्वय समितीने जारी केला आहे.


व्हिडिओतील दृष्यांवरुन पोलीस लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. लायब्ररीत विद्यार्थी शांतपणे अभ्यास करत होते. पोलीस अचानक लायब्ररीत घुसतात आणि विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात करतात. लायब्ररीतील सामानाचे नुकसान करतानाही पोलीस दिसत आहेत. यावेळी विद्यार्थी स्वत:ला वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करतात. पण तरीदेखील पोलीस त्यांना पळून पळून मारत असल्याचे व्हिडीओच्या दृष्यांमध्ये दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी नव्या सीसीटीव्ही फूटेजवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सध्या हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आले आहे. समोर आलेल्या व्हिडीओची तपासणी सुरु आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरवर प्रियंका यांनी लिहिले की, बघा दिल्ली पोलिसांनी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थांना कशी मारहाण केली. पोलिसांना एक विद्यार्थी पुस्तक दाखवत आहे, पण त्याला तरीही मारहाण झाली. गृहमंत्री आणि दिल्ली पोलिसांनी खोटे सांगितले की, लायब्ररीमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण झाली नाही. प्रियंका गांधी यांनी पुढे लिहिले की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील मारहाणीनंतर कुणावर कारवाई झाली नाही तर, सरकारच्या कारभारावर संशय निर्माण होईल.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधीतील गेल्या वर्षी 15 डिसेंबरला झालेले दिल्लीतील आंदोलन हिंसक झाले होते. पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली होती, तर सार्वजनिक बस आणि खासगी वाहनेही जाळली होती. त्यानंतर कारवाई करत दिल्ली पोलीस जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घुसले होते आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली होती.

Leave a Comment