पुणे, पिंपरीवरुन जाणाऱ्या गाड्यांना खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोलमाफी


पुणे – रविवारी टोल हटाव कृती समितीने पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. हे धरणे आंदोलन सर्वपक्षियांनी एकत्र येत केले होते. हे आंदोलन तीन तासांनंतर मागे घेण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी कृती समिती पदाधिकारी, सुप्रिया सुळे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची बैठक झाली. यापुढे पुणे आणि पिंपरीवरुन जाणाऱ्या गाड्यांना टोलमाफ करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला.

आजपासून खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे आणि पिंपरीवरुन जाणाऱ्या MH12 आणि MH14 पासिंगच्या वाहनांना टोल आकारण्यात येणार नाही असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत टोल हटवण्याबाबत बैठक होणार आहे. जोपर्यंत कायमस्वरुपी निर्णय होत नाही तोपर्यंत पुणे, पिपंरीच्या गाड्यांना टोलमाफ देण्यात येणार आहे. जर टोलनाका हलवला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा टोल हटाव कृती समितीने दिला आहे. टोलनाक्यावर आंदोलनादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न आणि कोंडी निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे वाहतूक वळवण्यात आली होती.

Leave a Comment