5 मिलियन डॉलर खर्च करुन वॉशिंग्टनमध्ये उभारले जाणार पहिले योग विद्यापीठ


अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे भारताच्या बाहेरील पहिले योग विद्यापीठ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या विद्यापीठातून योग अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देण्यात येणार आहे. या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

लॉस एंजलिसमध्ये विद्यापीठाने आपले कॅम्पस स्थापन केले असून 5 मिलियन डॉलरचा खर्च त्यासाठी येणार आहे. योगासन व त्यासंबंधीचे शिक्षण विवेकानंद योग विद्यापीठाच्यावतीने (वायू) देण्यात येणार आहे. ऑगस्ट 2020 पासून हा योग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तर, प्रवेश प्रक्रिया एप्रिल 2020 पासून सुरू होणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या चेअरमनपदी भारतीय योग गुरू एच. आर. नागेंद्र यांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘वायू’ च्या स्थापनेमागील नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांना मुख्य व्यक्ती समजले जाते. त्यांनी मागील चार दशकांपासून योगाचा प्रसार, शिक्षणासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. महत्त्वाची जबाबदारी केस वेस्टर्न विद्यापीठाचे प्राध्यापक श्री श्रीनाथ यांच्याकडेही असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान, भारतात 2002 मध्ये पहिल्या योग विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर योग आधारीत उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला होता.

Leave a Comment