
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामोर्चा आज मुंबईत होत असून राज्यातील कानाकोपऱ्यातून मनसैनिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यातच भाजप आमदाराने मुंबईला जाण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना गाड्या पुरवल्याचा आरोप होत आहे. मनसे कार्यकर्त्यांना पुण्यातील भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी वाहने पुरवल्याचा आरोप आहे. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
…यामुळे महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पुरवल्या गाड्या
आमदार महेश लांडगे वाहन पुरवल्याच्या आरोपावरुन एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, माझा वाहतुकीचा व्यवसाय आहे. मी कंपन्यांना बस पुरवततो. आज रविवार असल्याने त्या गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या असतील. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हीसुद्धा सीएए आणि एनआरसीचे समर्थन करतो. त्या कार्यक्रमाला जाणारे कार्यकर्ते हे भाजपचे आहेत, की नाही हे मला माहीत नाही. पण, तिथे जाणारा माणूस हा सीएएलाच समर्थन करत आहे, देशाच्या हितासाठी देशाच्या बाजूने आपले मत व्यक्त करत आहे. मग तो चांगल्याच कार्यक्रमाला गेला आहे. त्या चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल, तर माझी त्याला हरकत नाही.
