यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ – राज ठाकरे


मुंबई – बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाला गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून सुरुवात झाली. आझाद मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी भाषण केले. राज ठाकरे यावेळी म्हणाले की, मला काही जण म्हणत होते की, 11.55 मिनिटांनी येणार आहे? त्यांना मी बोललो मी काय ट्रेन आहे का वेळेवर यायला? वेळ लागतो, असे उत्तर राज ठाकरे यांनी टीकाकारांना दिले.

देशभरातील मुस्लिमांनी सीएए आणि एनआरसीवरून मोर्चे काढले. या मोर्चांचा मला अर्थच लागत नाही. देशातील मुस्लिमांना कोण बाहेर काढत आहे ? कायद्याबद्दल माहिती नसणारेही कसे बोलत आहे? मला अनेक जण म्हणत आहेत, तुम्ही भाजपसोबत जाणार का ? अरे काय सरकारची स्तुती केली, तर भाजपचा समर्थक होतो का? आपल्या देशात उजवा किंवा डावा एवढेच सुरू आहे. जे चांगले त्याला चांगले म्हणालो. जे वाईट होते त्याच्यावर टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयावर मी टीका केली, त्यावेळी मला भाजप विरोधक ठरवण्यात आले. आता भाजपचे समर्थक ठरवले जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांवर त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. भारताचे नागरिकत्व पाकिस्तानातील मुस्लिमांना देण्याची काय गरज? माझा देश धर्मशाळा आहे का? फक्त भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. या देशातील नागरिकांना बाहेर काढले जाणार नाही. येथील आदिवासी येथेच राहणार आहे. मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्याने राहावे. नाहीतर यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, असा इशारा राज यांनी यावेळी दिला. सीएए, एनआरसीवरून देशात गोंधळ सुरू आहे. पण, केंद्र सरकारलाही विचारणार आहे. सध्या देशात जी आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. ती अराजकता लपवण्यासाठी हा कायदा करत आहात का? हे आधी स्पष्ट करावे, असेही राज म्हणाले.

सीएएला विरोध तर एनआरसीचे समर्थन केल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोऱ्यांविरोधात मनसेचा मुंबईत मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाची गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरु होती. मनसेच्या वतीने या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.

या मोर्चाला घुसखोरांविरुद्धच्या लढाईचे स्वरूप मनसेने दिले आहे. या मोर्चासाठी जिमखाना आणि आझाद मैदानावर जय्यत तयारी झाली. पोलिस बांदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मुंबईत या मोर्चासाठी मनसेचे पोस्टर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन महामोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्यात येत होती.

Leave a Comment