राम मंदिराच्या कामाला ‘या’ दिवशी होणार सुरुवात


लखनऊ: अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने कौल दिल्यानंतर लवकरच आता याठिकाणी मंदिर निर्माणाच्या कार्याला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. अंतिम टप्प्यात ही सगळी तयारी आली असल्यामुळे राम मंदिर निर्माणाच्या कार्याला येत्या रामनवमीला प्रारंभ होईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य आणि मणिराम दास छावणीचे महंत कमल नयन दास यांनी दिली. मंदिराची निर्मिती विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) प्रस्तावित केलेल्या मॉडेलवरून होईल, असेही कमल नयन दास यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत राम मंदिराच्या निर्माणासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली होती. ‘राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असे या ट्रस्टचे नाव असेल. दलित समाजातील एका व्यक्तिसह १५ सदस्य राम मंदिर ट्रस्टमध्ये असतील. यापैकी ९ जण कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असतील.

हे विश्वस्त मंडळ सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरण यांच्या घरामधूनच काम करणार आहे. विश्वस्त मंडळात ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण असतील. या विश्वस्त मंडळात जगतगुरू शंकराचार्य, जगतगुरू माधवानंद स्वामी, युगपुरुष परमानंदजी महाराज यांचाही समावेश आहे. याशिवाय, पुण्याचे गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांचाही ट्रस्टच्या सदस्यांमध्ये समावेश आहे.

Leave a Comment