गडकिल्ल्यांवर दारु पिऊन धांगडधिंगा केल्यास 10 हजारांच्या दंडासोबत 6 महिने तुरुंगवास


मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची महाराष्ट्रातील गडकिल्ले नेहमीच आठवण करुन देतात. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सध्या विविध उपक्रम राबले जात आहेत. पण गडकिल्ल्यांवर ट्रेक करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. परंतु गडकिल्ल्यांवर पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या काही लोकांकडून तेथे गैरवर्तवणूक केली जात असल्याचे प्रकार ही समोर आले आहेत. त्यामध्ये विशेष करुन गडकिल्ल्यांवर दारु पिण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे आता जर गडकिल्ल्यांवर तुम्ही दारु प्यायली तर तुम्हाला कडक शिक्षा तर होणारच आहे. त्याचबरोबर 6 महिन्यांच्या तुरुंगवासासोबत 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

गडकिल्ल्यांवर दारु पिताना आढळल्यास शिक्षा करण्यात येईल असा निर्णय राज्याच्या गृहविभागाकडून घेतला आहे. कारण गडकिल्ल्यांना काही जण पिकनिक स्पॉटचे नाव देऊन तेथे गैरवर्तणुक करतात. त्याचबरोबर किल्ल्यांवर दारु पिऊन धिंगाणा घातल्याचे प्रकार ही उघडकीस आले आहेत. तर गडकिल्ल्यांवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पोहचलेल्या दारु पिणाऱ्या एका ग्रुपला चोप देखील देण्यात आला होता. नेहमीच गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखावे असे वारंवार सांगून सुद्धा तेथे गैरवर्तवणूक केली जाते. पण या नव्या नियमामुळे आता अशा गोष्टींना चाप बसणार एवढे मात्र नक्की आहे,

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85 अंतर्गत गडकिल्ल्यांवर दारु प्यायल्यास शिक्षा केली जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षा झाल्यानंतर पुन्हा तशी वर्तवणूक केल्यास शिक्षेत वाढ केली जाणार असून 1 वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे. दारुड्यांवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शिक्षेसंबंधित सूचना सुद्धा किल्ल्यांवर लावण्यात येणार आहे.

Leave a Comment