बबनराव लोणीकरांकडून महिला अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह उल्लेख


जालनाः नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. स्थानिक तहसीलदार असलेल्या महिला अधिकाऱ्याचा लोणीकर यांनी आक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. महिला तहसीलदारांचा लोणीकरांनी थेट हिरोईन असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत आहे.

त्यांनी हा आक्षेपार्ह उल्लेख जालन्यातील परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या 33 केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बबनराव लोणीकर म्हणाले, 25 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना हवे असेल तर त्यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. अधिवेशनाआधी शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो. तरच राज्यातील सरकार त्यांना 25 हजार रुपयांचे अनुदान देईल.

50 हजार या मोर्चाला लोक यावेत. या मोर्चासाठी मी कुणाला आणू हे तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का?, की एखादी हिरोईन आणू?, हे मला तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसीलदार मॅडम आहेत, त्याही हिरोईन सारख्याच दिसतात.

बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. यावेळी स्टेजवर त्यांचा मुलगा आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, तहसीलदार मॅडम, सरपंच बसलेले होते. तहसीलदार मॅडम लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर स्टेजवरून उठून गेल्या. पण याविषयी लोणीकर यांना काहीच वादग्रस्त वाटले नाही. जे काही मी बोललो त्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याचे लोणीकर म्हणाले. याबाबत बबनराव लोणीकरांनी माफी मागावी. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून लोणीकरांवर काय कारवाई करता येईल, याची माहिती आम्ही घेऊ, असे तहसीलदार संघटनेने म्हटले आहे.

Leave a Comment