कार्तिक-साराच्या लव आज कलचा ट्रेलर रिलीज


इम्तियाज अली दिग्दर्शित लव आजकल 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही फ्रेश आणि बहुचर्चित जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काल रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज करण्यात आला आहे.

अगदी सुरुवातीपासूनच लव आजकल 2 हा चित्रपट चर्चेत आहे. मध्यंतरी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता कार्तिक साराची सिझलिंग केमिस्ट्री रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ही कथा वीर आणि जुईची आहे. सारा या चित्रपटात एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत तर कार्तिक एका थोड्याशा लाजऱ्या आणि गोंधळलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे.

करण जोहरच्या चॅट शोमध्ये साराने कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर एका इव्हेंटमध्ये अभिनेता रणवीर सिंहने या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव आज कल 2’साठी साइन केले आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. पण दरम्यानच्या काळात या दोघांचे ब्रेकअप झाल्याचेही समोर आले आहे.

2009 मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणच्या ‘लव आज कल’चा इम्तियाज अली यांचे दिग्दर्शन असलेला ‘लव आज कल 2’ हा चित्रपट सिक्वेल आहे. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सारा आणि कार्तिकचा हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment