नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद!


मुंबई – संपूर्ण देशभरात नागरीकत्व दुरूस्ती कायदा हा लागू झाला असून अजूनही अनेक राज्यातून या कायद्याला विरोध दर्शवला जात आहे. यातच शुक्रवारी 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीची बैठक मुंबई येथील दादर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.

अनेक निदर्शने देशात नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात करण्यात आली होती. संपूर्ण देशात सध्या नागरिक दुरूस्ती कायदा लागू झाला असून या कायद्याच्या विरोधात अनेक राज्यातून आवाज उठवला जात आहे. यातच 24 जानेवारीला नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची घोषणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पत्रकार परिषेद घेऊन याबाबतीत घोषणा केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, दडपशाही करुन हा कायदा लागू करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. तसेच जीएसटी, नोटबंदीमुळे सरकारला पुरेसा निधी मिळत नाही. केवळ केंद्र सरकार याला जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्रातील ज्या संघटनांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी यांच्या विरोधात आंदोलने केली होती. अशा सर्व संघटनांना वंचित बहुजन आघाडीने आमंत्रित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल 35 संघटनांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Leave a Comment