तुम्हाला थोडीफार किंमत ठाकरे आडनावामुळेच मिळत आहे


नाशिक – अवघ्या काही दिवसांवर नाशिक महानगरपालिकेची प्रभाग क्र.26 मधील पोटनिवडणूक येऊन ठेपली आहे. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रभागातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचारासाठी उपस्थिती लावली. त्यांनी प्रतिस्पर्धी मनसेच्या उमेदवाराला यावेळी जाहीर भाषणादरम्यान लक्ष्य केले. मनसे हा पक्षच नसून बाळासाहेबांशी गद्दारी करणारे संपले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुम्हाला जी थोडीफार किंमत मिळत आहे ती केवळ ठाकरे आडनाव असल्यामुळेच मिळत असल्याचे वक्तव्य करून त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

आता मी पाणी पुरवठा मंत्री झालो आहे आणि पहिले पाणी नाशिकमध्येच पाजायला आलो असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांची जाहीर सभा खुटवडमध्ये झाली. यावेळी भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. भाजपने आजपर्यंत मुस्लीम बांधवांचा फक्त वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासूनच भाजपने जोरदार टीका सुरू केली. याला प्रत्युत्तर देताना, आमच्या पोराला तुम्ही काळे बोलणार आणि स्व:ताच्या मुलाला गोर बोलणार, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच कोणाशीही भाजपने केलेली युती चालते, असे ते म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजप भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शहरात पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Leave a Comment