मुंबईत उमटले जेएनयू हिंसाचाराचे पडसाद


मुंबई – मुंबईतील अनेक महाविद्यालये आणि संस्था जेएनयू हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. त्यांनी मध्यरात्री 12 वाजेपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या संस्थांनी गुंडांवर कारवाई करण्याची मागणीही केली असून हे आंदोलन गेट वे ऑफ इंडिया येथे होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या तत्काळ राजीनाम्याची या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराबद्दल मुंबईकरांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद याने या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. विद्यार्थ्यांची केंद्र सरकारकडून मुस्कटदाबी केली जात आहे. जेएनयू विद्यार्थ्यांना बजरंग दल, एबीव्हीपीच्या गुंडांकडून मारहाण केली गेल्याचा आरोप उमर खालिद याने केला आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या 15 जणांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचा आरोपही खालिद यांनी केला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांची वाढवण्यात आलेल्या शुल्कासंदर्भात आंदोलन सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हे आंदोलन दाबण्यासाठी मुस्कटदाबी केला जात असल्याचाही खालिद याने केला आहे. दरम्यान, मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ रात्रभर बसून जेएनयू समर्थक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अद्यापही आंदोलन सुरू ठेवण्याचा निश्चय या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Leave a Comment