विधीमंडळाच्या सर्व आमदारांच्या फोटोमधून देवेंद्र फडणवीस गायब


नागपूर : शेतकरी कर्जमाफी, सावरकर तसेच सामनाच्या मुद्द्यावरुन नागपूरमधील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसांपासून गाजत आहे. आज विधीमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण आजच्या कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र आले. फोटोसेशनसाठी पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले, ज्येष्ठ आमदार एकत्र जमले. पण या फोटोसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कुठेच न दिसल्यामुळे काही काळ देवेंद्र फडणवीसांच्या गैरहजेरीबाबत चर्चा झाल्याचेही पाहायला मिळाले.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन असून मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सर्वपक्षीय सदस्यांचे एकत्रित फोटोसेशन करण्याची विधीमंडळाची प्रथा आहे. विरोधक ज्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देत आंदोलन करतात, त्याच विधानभवनाच्या आवारात सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र येतात. सर्वपक्षीय आमदार याच परंपरेनुसार आज विधानभवनाच्या आवारात एकत्र आले आणि एक मनाने, एक दिलाने फोटोसेशन केले.


मागील चार दिवस विरोधकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवरुन गदारोळ करत गाजवले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन आजही विधीमंडळ अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. पण सर्व आमदार खांद्याला खांदा लावून एकाच फ्रेममध्ये सामील झाले. पण या फोटोसेशनसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र कुठेही न दिसल्याने चर्चा रंगली होती.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीवर विरोधी पक्षनेत्यांना बोलावले होते. पण ते वैयक्तिक कारणास्तव पोहोचू शकले नसल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यातील विधीमंडळात लोकसभेप्रमाणे नवीन पायंडा पडण्याचा माझा प्रयत्न आहे. विरोधी पक्ष नेत्यांना बोलावले होते पण ते वैयक्तिक कारणास्तव पोहोचू न शकल्यामुळे याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. विधासनभा निवडणुकीत केलेल्या वक्तव्यांशी काही संबंध नाही, कारण मला सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान आहेत. कितीही मतभेद असले तरी आम्ही एकत्र आहोत हे स्पिरीट लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे.

Leave a Comment