भोजनानंतर वज्रासानात बसणे पचनक्रियेस फायदेशीर


पण खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचणे हे रोगांना आमंत्रणच असते. अपचन, गॅसेस, अॅसिडीटी, मायग्रेन, पित्तामुळे डोकेदुखी, पोट फुगणे इत्यादी तक्रारी सुरु झाल्या की आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचविले जात नसल्याचे ओळखावे. पण केवळ एका आसनामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन पचनक्रियेशी निगडीत सर्व तक्रारींपासून सुटका होणे शक्य आहे. हे आसन म्हणजे वज्रासन. हे आसन भोजन केल्यानंतर पंधरा मिनिटे दररोज करावे. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. योगशास्त्रानुसार ज्यांना वज्रासनामध्ये बसून जेवण घेणे शक्य असेल त्यांनी तसे केल्याने अधिक फायदा होतो. भोजनानंतर वज्रासनामध्ये बसल्याने शरीरातील रक्तप्रवाह पोटाकडे वळविला गेल्याने अन्नाचे पचन चांगल्या रीतीने होते.

वज्रासनाला डायमंड पोज, किंवा थंडरबोल्ट पोज या नावांनी देखील संबोधले जाते. हे आसन केवळ योगाभ्यास करणाऱ्यांमध्येच नाही, तर अनेक धर्मांमध्ये, व निरनिराळ्या संस्कृतींमध्येही प्रचलित आहे. मग ती संस्कृती इस्लाम शी निगडीत असो, किंवा जपानी संस्कृती असो, किंवा बौद्ध संस्कृती असो. या सर्वच संस्कृतींमध्ये वज्रासनाला विशेष महत्व आहे. वज्रासनामुळे अन्नाचे पचन चांगले होतेच पण त्या शिवाय शरीरातील स्नायूंची व हातापायांची लवचिकता वाढते. जपानमध्ये जेवण घेताना किंवा चहा घेताना जमिनीवर वज्रासनात बसण्याची पद्धत आहे. जेवण झाल्यानंतर लगेचच वज्रासनात बसण्याचा सल्ला योगशास्त्र देते.

आपल्या शरीरातील निरनिराळ्या अवयवांना त्यांच्या कार्याप्रमाणे आवश्यक तितका रक्तपुरवठा केला जातो. रक्तापुरवठ्याचे हे प्रमाण प्रत्येक अवयवाच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे असते. जेवण झाल्यानंतर खाल्लेले अन्न पचविण्यासाठी आपल्या आतड्यांना अधिक रक्तपुरवठ्याची गरज असते. वज्रासानामध्ये बसताना पाय दुमडून बसल्याने पायांकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होऊन हे रक्त आतड्यांकडे वळविले जाते. या अतिरिक्त रक्तपुरवठ्यामुळे अन्न पचनाचे काम सुकर होऊन पचनाशी निगडीत विकार नाहीसे होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही