अनु मलिकच्या जागी हिमेश रेशमियाची वर्णी


संगीतकार-गायक अनु मलिकला #MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वाच्या परीक्षकपदावरून माघार घ्यावी लागली. त्यांनी हा शो सोडल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार याविषयीची चर्चा गेल्या काहीदिवसांपासून चाहत्यांमध्ये रंगली होती. पण सोनी टीव्हीने या चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे. या कार्यक्रमात आता अनु मलिक यांच्या जागी संगीतकार गायक हिमेश रेशमियाची वर्णी लागल्यामुळे आता विशाल दादलानी आणि नेहा कक्कडसोबत हिमेश रेशमिया या पर्वात पाहायला मिळणार आहे.

अनेक महिलांनी मागील वर्षी #MeToo या मोहिमेअंतर्गत संगीतकार अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. यात त्याच्यावर गायिका सोना मोहपात्राने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. अनु मलिकवर या दोन गायिकांनीही लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या पर्वातून परीक्षकपदावरून सोनी वाहिनीने त्यांना काढून टाकले होते. पण अनु मलिक पुन्हा एकदा अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जेव्हा अनु मलिक ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून परतले, तेव्हा सोशल मीडियाद्वारे सोनाने पुन्हा मोहिम सुरु केली. तिच्या अनु मलिकविरोधी मोहिमेला सोशल मीडियावर अनेक महिलांचा पाठिंबा मिळाला. अखेर अनु मलिकने स्वत:तून माघार घेतली व शो सोडण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment