काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले


मुंबई – काँग्रेसकडून नाना पटोले यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले असून ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोणताही वाद उपमुख्यमंत्रीपदावरुन नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीलाच उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल करण्यात आला आहे.

महाविकासआघाडीच्या चर्चेत काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला होता. काँग्रेसकडून शुक्रवारी यात बदल करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा आग्रह धरण्यात आला. पण ही मागणी राष्ट्रवादीने फेटाळून लावली. तरीही काँग्रेसचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीही सत्तावाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. बुधवारी रात्री आघाडीच्या झालेल्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला, असा निर्णय झाला होता. या बदल्यात राष्ट्रवादीला एक अतिरिक्त मंत्रिपद मिळणार होते.

पण काँग्रेसने शपथविधीच्या दिवशी या निर्णयात बदल करण्याची मागणी केली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला. पण ही मागणी राष्ट्रवादीने फेटाळून लावली होती. शुक्रवारी पुन्हा काँग्रेसने नव्याने प्रयत्न सुरू केले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे. या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळावे, अशी मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदावर काँग्रेसने दावा केला असला, तरी तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत झालेला निर्णय आता बदलणार कसा, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. काँग्रेसची बदल करण्याची मागणी मान्य करता येणार नाही, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

Leave a Comment