गोव्यात परिवर्तन करायला निघालेल्या राऊतांना काँग्रेसचा दणका


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर आपला मोर्चा शिवसेनेने गोव्याकडे वळवला असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर आगामी काही दिवसात गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही केला होता. आपल्या संपर्कात गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री असून गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजप सरकार घालवणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पण त्यांच्या वक्तव्याच्या २४ तासनंतर त्यांना काँग्रेसनेच मोठा दणका दिला आहे. विरोधी पक्षातच आपण बसणार असल्याचे गोवा काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

आपण गोवा सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील नसल्याचे गोवा काँग्रेसने म्हटले आहे. त्याचबरोबर सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा काँग्रेस विरोधी बाकांवर बसणे पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. महाराष्ट्राचे राजकारण आमच्यासाठी संपले असून गोव्याच्या राजकारणात सध्या व्यस्त असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणे फ्रंट उभा केला जात आहे. ज्या प्रकारे गोव्यात सरकार निर्माण केले आहे ते सर्वांना माहिती असून हे आमच्यावर टीका करतात, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

गोव्यातील ४० पैकी ३० आमदार हे भाजपच्या बाजूने असल्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावर बसू, असे चोडणकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणे बंद करा, असा टोला भाजप नेते विनय तेंडुलकर यांनी राऊत यांना लगावला.

Leave a Comment