उद्या घरबसल्या पाहात येणार बहुमत चाचणी


नवी दिल्ली: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध केलेल्या याचिकांवर आज, मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. उद्याच महाराष्ट्रात बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. बहुमत चाचणीवेळी कोणत्याही प्रकारचे गुप्त मतदान नको, त्याचबरोबर त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. शपथविधी सोहळा बहुमत नसताना घाईघाईने उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरील विश्वासमताची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर आज महत्वपूर्ण निकाल दिला. लोकशाही मूल्यांचे रक्षण झाले पाहिजे. चांगले सरकार मिळवण्याचा लोकांना अधिकार असल्याचे मत न्यायमूर्ती रमन्ना यांनी मांडून महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा आदेश दिला.

बहुमत चाचणीच्या निर्णयासोबतच या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, तसेच मतदान हे गुप्त पद्धतीने करु नये, असेही न्यायालयाने सांगितले. बहुमत चाचणी उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. आम्ही तिन्ही पक्ष न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर समाधानी आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा द्यावा, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave a Comment