अखेर मुख्यमंत्रिपदाचा देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा


मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदत घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत उरले नसल्यामुळे राज्यपालांना भेटून मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करतानाच नवे सरकार बनविणाऱ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.

उपमुख्यमंत्रिदाचा राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवल्यामुळे आमच्याशी अजित पवार यांनी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे त्यांचा एक गट आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले.

सर्वोच्च न्यायालयाने आज बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. पण, अजित पवार आज सकाळी मला भेटले आणि त्यांनी काही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर आम्ही कोणाचाही आमदार फोडणार नसल्याचे मी आधीच सांगितले होते. कोणताही घोडेबाजारही आम्हाला करायचा नाही. केवळ राष्ट्रवादीचा गट आमच्याकडे आल्याने आणि पुरेसे संख्याबळ असल्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्यावर जास्त काळ राजकीय पोकळी ठेवता येत नाही. त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन केल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment