अवघ्या काही तासांत हटवले गेले बारामतीतील शरद पवारांचे पोस्टर्स


पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शनिवारी सकाळी अजित पवारांनी राजभवनात उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल रात्रीपर्यंत राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले असताना राज्यातील राजकारणाची हवा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीने पूर्णपणे बदलली. राज्यभरात अजित पवारांच्या निर्णयाचे पडसाद उमटायला लागले. बारामतीमध्येही नागरिकांनी शहरात मोठी पोस्टर्स लावत आम्ही, ८० वर्षाच्या योद्ध्यासोबत असल्याचे म्हणत शरद पवारांचे समर्थन केले होते.

पण बारामतीतील हे पोस्टर अवघ्या काही तासांमध्ये हटवण्यात आले आहेत. शरद पवारांचा बारामती हा गड मानला जातो. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेली अनेक वर्ष शरद पवारांनी बारामतीमधील विकासकार्याच्या माध्यमातून स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. पण त्याच शहरात आता शरद पवारांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले पोस्टर्स उतरवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान हे पोस्टर पवार घराण्यात कोणताही वाद नको, यासाठी हटवण्यात आल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. पण अजित पवारांना यावेळी स्थानिक उपस्थित नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शवला.

Leave a Comment