हैदराबादमध्ये समोरासमोर झाली दोन रेल्वेची धडक, सीसीटीव्हीमध्ये कैद झाला थरार


हैदराबाद – हैदराबादमधील काचीगुडा रेल्वे स्थानकाजवळ लिंगमपल्ली-फलकनुमा इंटरसिटी ट्रेन आणि कुर्नूल सिटी-सिकंदराबाद हंड्री एक्सप्रेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. १२ प्रवासी यात गंभीर जखमी झाले. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. वेगाने येणाऱ्या इंटरसिटी ट्रेनचे २ डबे धडक झाल्यानंतर अक्षरशः हवेत उडाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.


ही घटना दक्षिण मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप केला जात आहे. या फुटेजमध्ये धडक झाल्यानंतर फारसे जखमी न झालेले प्रवासी ट्रेनमधून उतरून भीतीने दूर पळत असल्याचेही दिसत आहे. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही रेल्वे गाड्यांचे डब्बे चांगलेच चेपले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात एमएमटीएस गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आणि तो त्याच्या केबिनमध्ये अडकला. काही तासानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ऑपरेशन दरम्यान त्याला ऑक्सिजन आणि इतर जीवनरक्षक वैद्यकीय मदत देण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 5000 रुपये आणि गंभीर जखमी प्रवाशाला 25,000 रुपये अनुदान जाहीर केले आहे.

Leave a Comment