सरकार बनवण्यास राष्ट्रवादीने असमर्थता दाखवल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट शक्य


मुंबई – राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. या संदर्भातील अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवल्यामुळे महाराष्ट्रात रात्री साडेआठनंतर कधीही राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राज्यपालांनी यासंदर्भातील शिफारस केली आहे.

सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ महाराष्ट्रात निर्माण झाला असून सत्तास्थापनेसाठी भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी निमंत्रण दिले. पण हा दावा त्यांना सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जर रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे चित्र स्पष्ट होत आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण कॅबिनेटची तातडीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली आहे. महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्रिक्स समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझीलला रवाना होणार आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याआधीच कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment